भारत गणेशपुरेंनी फुले\आगरकर\आंबेडकर यांची विज्ञाननिष्ठ परंपरा हास्यास्पद ठरवली आहे!


भारत गणेशपुरे हे ‘चला, हवा येऊ द्या’ या मनोरंजनापर कार्यक्रमातील प्रसिद्ध कलाकार. त्यांनी आपल्या बायकोशी नुकतंच दुसर्‍यांदा लग्न केलं. त्यांच्या लग्नाला जवळपास १८ वर्षं ओलांडल्यानंतर त्यांना असं लग्न करावंसं वाटलं. या लग्नाची प्रसारमाध्यमांनी कौतूक म्हणून दखल घेतली. पण अशा आगळ्यावेगळ्या लग्नामागे अनेक हेतू अन कारणं असण्याची शक्यता आहे. त्या शक्यता माध्यमांनी दुर्दैवानं पाहिलेल्या नाहीत. मात्र लग्नाला कोण आलं? दुसर्‍यांदा लग्न करताना कसं वाटतं, याचा लेखाजोखा नेहमीच्या बाळबोध पद्धतीनं टीव्हीवाल्यांनी दाखवला.

या लग्नाबाबत स्वतः भारत गणेशपुरे यांनी ‘आम्ही आयुष्यात पुन्हा गंमत यावी म्हणून लग्न करत असल्याचं’ गमतीनं सांगितलं आहे. त्यांच्या पत्नीनं ‘घरी काहीतरी फंक्शन असावं असं वाटलं. त्यातून पुन्हा लग्न करण्याची कल्पना पुढे आल्याचं’ सांगितलं.

काही मोजक्या माध्यमांनी गणेशपुरे यांचा ज्योतिषशास्त्रावर असलेला विश्वास या लग्नाला कारणीभूत असल्याचं पुढे आणलं आहे. ते खरं असण्याची शक्यता अधिक आहे. स्वतः गणेशपुरे यांनी मात्र थेट तसा दावा केलेला नाही. अर्थात तसा थेट दावा ते करणार नाहीतच. ज्यांनी ज्योतिषशास्त्राच्या संदर्भाचा दावा केला, तो गणेशपुरे यांनी खोडलेला नाही. त्यामुळे त्यांचा ज्योतिषशास्त्रावर असलेला विश्वास हेच कारण असण्याची शक्यता अधिक वाटते.

या शक्यतेचा एक कंगोरा असाही आहे की, कुणी केवळ गंमत म्हणून त्याच जोडीदाराबरोबर लग्न करणं अशक्य वाटतं. त्याचबरोबर घरात फंक्शन ठेवायला कोणतंही कारण शोधता आलं असतं. त्यासाठी लग्नच पुन्हा करण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे हा विषय गांभीर्यानं समजून घेतला पाहिजे.

गणेशपुरे अलीकडच्या काळात परदेशात ‘चला हवा येऊ द्या’च्या कार्यक्रमात असताना त्यांना सौम्य ॲटॅक येऊन गेला. त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला असावा! पण ते त्यांना पुरेसं वाटलं नसावं. म्हणूनच त्यांनी आपला हात ज्योतिषाला दाखवला. सदर ज्योतिषानं ‘तुमच्या लग्नाची गाठ सैल झाली’ असल्याचं सांगितलं. त्यावरचा पर्याय म्हणून पुन्हा बोहल्यावर चढण्याचा अ-वैज्ञानिक सल्ला दिला. गणेशपुरे यांनी भावनिक भीती म्हणा किंवा ज्योतिषावर (भीतीयुक्त) श्रद्धा ठेवून तो स्वीकारला. अन पुन्हा लग्नगाठ घट्ट आवळून घेऊन स्वत:चं आयुष्य वाढवून घेतल्याची भंपक भावना बळावून घेतली.

आपल्या खाजगी आयुष्यात कुणी काय करावं, हा ज्याचा त्याचा चॉईस असतो. त्यामुळे गणेशपुरे यांना तो अधिकार आहे. पण अशा प्रसिद्ध कलाकारानं असं केल्यावर त्याचे समाजमनावर होणारे परिणाम लक्षात घ्यायला हवेत. किंबहुना समाजप्रिय व्यक्तींच्या खाजगी आयुष्याचे सार्वजनिक परिणाम तेवढेच मोठे असतात. ते परिणाम काय अन कसे असू शकतात, यासाठी गणेशपुरे यांच्या लग्नाची दखल घेणं आवश्यक वाटतं.

सर्वप्रथम आपला एकूण समाज, त्याचे आकलन\आकर्षण या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. त्यातच पॉप्युलर लोकांमध्ये सामाजिक-शैक्षणिक आकलनाच्या मर्यांदामुळे संकुचित भक्तीभाव डोकावलेला असतो. म्हणून आपल्याला अशा तथाकथित प्रसिद्ध व्यक्तींचं दुर्दैवी व्यक्तीस्तोम लक्षात घ्यावं लागतं. त्यांच्या आकर्षणाचे संदर्भ अन त्याचे परिणाम समजून घ्यावे लागतात.

आपला एकुणच समाज इथल्या पारंपरिक मनुवादी व्यवस्थेनं संकुचित मानसिकतेत ठेवण्याचं काम एका विशिष्ट हेतूनं केलेलं आहे. ते करताना त्यामागे मानवी जीवसृष्टीच्या इतिहासक्रमापासून सोबतीला असलेल्या भीतीच्या भांडवलातून अर्थप्राप्ती करून घेण्याच्या उद्देशानं ज्योतिषशास्त्राचा व्यूह रचला गेला आहे. त्यामध्ये नैसर्गिक वाटावं असं दर्शन घडवलेलं असतं. या सगळ्याचे परीणाम भोगत हा समज जगतो आहे.ज्योतिषशास्त्र नावाला शास्त्र आहे. ते खरं मुळात एक दुकान आहे. अशा दुकानावर प्रसिद्ध व्यक्तीनं खरेदी केली की, त्याची आपसूक जाहिरात होणार!

गणेशपुरेंच्या या लग्नामुळे त्याच जोडीदाराशी दुसरं लग्न लावण्याची फॅशन बोकाळायला वेळ लागणार नाही. गणेशपुरेंनी कितीही स्वतःच्या भावनासाठी हे केलं असलं तरी दुष्परिणाम आगामी काळात दिसतील. कारण आपल्या समाजाला आपण कशाच्या मागे जाण्यात दीर्घकालीन फायदा आहे, हेच अजून कळलेलं नाही. विनोदी अभिनय अन लोकांना हसवण्याचं काम गणेशपुरे करत असले तर त्यांच्याकडे ज्योतिषशास्त्राच्या मागे धावण्याचं शास्त्रीय लॉजिक असण्याची शक्यता नाही. आपल्या मनातील भीती घालवण्यासाठी विशिष्ट हेतूनं बिंबवलेनं ज्ञान म्हणजे ज्योतिषशास्त्र. आजवर अनेक लग्न या शास्त्राच्या प्रेमातून झाली. त्यातून अगदी पत्रिकेत ३६ पैकी ३६ गुण जुळणाऱ्यांची आयुष्यंदेखील बेचिराख झालेली पाहायला\अनुभवायला मिळतात.

त्याचप्रमाणे दुसर्‍या बाजूला पत्रिका न पाहता लग्न केलेली जोडपी उत्तम अन आनंदी आयुष्य जगताना पाहायला\अनुभवायला मिळतात. किंवा अगदी ज्यांनी पाहून केलं, पण पत्रिकेत फार कमी गुण जुळत असतानाही त्यांचंही उत्तम आयुष्य चालताना दिसतं. थोडक्यात पत्रिकेत अन ज्योतिषशास्त्राच्या खजिन्यात भरीव असं काही नाही. चालत आलंय म्हणून चाललं आहे. मात्र तरीही मनात भीती निर्माण करण्यात हे शास्त्र यशस्वी झालेलं आहे. ग्रामीण भागात जे लग्न जमवणारे ज्योतिषी असतात, ते पत्रिका हवी तशी जुळवून देतात. ते कसं होतं? आमच्या नातेवाईकांमध्ये\मित्रांमध्ये अनेक मुलांनी देवबाप्प्पाला जास्त पैसे देऊन पत्रिका जुळवल्या. आणि त्यांचंदेखील उत्तम चाललं आहे. कुठेही अडचण नाही.

त्यामुळे गणेशपुरेनी त्यांचं दुसरं लग्न पूर्णपणे खाजगीत पार पाडलं असतं तर बरं झालं असतं. पण तसं झालं नाही. ते न होण्याचं कारण तितकंच स्वाभाविक आहे. गणेशपुरेंसारख्या कलाकारांचा अभिनय कितीही लोभस वाटत असला तरी त्यांचा सार्वजनिक बुद्धांक तितकासा विकसित झालेला नसतो. इतरांचं सोडा, पण अगदी ‘चला, हवा येऊ द्या’च्या बाबतीत पाहिलं तर काय दिसतं? गेल्या तीन-चार वर्षांत सुमार दर्जाच्या साहित्याचं ओंगळवाणं दर्शन घडवत, ही माणसं लोकांचं मनोरंजन करत आहेत. या मनोरंजनानं महाराष्ट्राचं एकुण कलाविश्व अजूनच आक्रसलेलं आहे. कारण विनोदी चाठाळपणाला जोर चढला की, मूलभूत अन दर्जेदार विनोदाला लोक नाकारतात. हे सगळं इतकं सहज घडत जातं की, लोकांच्या लक्षात यायच्या आतच सार्वजनिक गुणवत्तेचा बळी गेलेला असतो.

गणेशपुरेंची ओळख विनोदी कलाकार अशीच आहे. त्यांचा विनोद अधिक प्रमाणात बघणारा समाज सर्वसाधारण आकलनाचाच आहे. त्यात शिक्षण अन सामाजिक जीवनाचं गुंतागुंतीचं आकलन असणाऱ्यांचं प्रमाण कमीच असण्याच्या शक्यता आहेत.

ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली आजवर अनेक भाकडकथा तयार झाल्या. त्यांनी समाजाच्या सर्वसाधारण आकलनाचा बळी घेतलेला आहे. समाज अवतीभोवतीच्या प्रतीकाकडे बघत असतो. टीव्हीच्या वाढत्या प्रभावाच्या जंजाळात टीव्हीवर दिसतं, ते सत्य अन तेच महान असं मानण्याची सवय असण्याचा हा काळ आहे. त्यामुळे गणेशपुरेंचं दुसरं लग्न करणं अन त्याची जाहीर वाच्यता, त्यात त्यानं स्वतः सहभागी होणं, अधिक नुकसान करणारं आहे.

लग्नगाठ ढिली झाली, त्यासाठी पुनश्च लग्न करण्याचा सल्ला देण्याच्या मागे मोठा व्यावसायिक हेतू असण्याची शक्यता अधिक वास्तववादी वाटते. कारण येत्या काळात हा एक नवीन पर्याय म्हणून पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण भंपक विनोदबाजीनं लोकांच्या मनात घर केलेल्या सेलेब्रिटीसारखं करावंसं वाटणं स्वाभाविक असणार.

यावर असा प्रतिवाद केला जाऊ शकतो की, त्यांनाजे वाटलं त्यांनी ते केलं. ज्याला जे वाटेल त्यानं ते करावं. त्यांच्यामुळे समाजाला अशा गोष्टींचं आकर्षण वाटलं तर ती त्यांची चूक थोडीच आहे? क्षणभर हा प्रतिवाद स्वीकारला तरी प्रसिद्धीस आलेल्या कलाकारांना लोक फॉलो करतात, हे सत्य आहे. म्हणून आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्टी समाजाला चुकीचं वळण लावत असतील तर त्याबाबत अधिक काळजी घेतली पाहिजे. ती घेतली गेली नाही तर होणाऱ्या सामाजिक दुष्परिणामांचे आपण कारक बनतो.

आधुनिक समाज वैज्ञानिक पायावर उभा असतो. ज्योतिषासारख्या तद्दन विज्ञानहीन कुडमुड्या शास्त्राचं बोट पकडत महाराष्ट्राला हसवणार्‍या या विनोदवीरानं आपल्या कृतीतून फुले, शाहू, आगरकर, आंबेडकर यांची विज्ञाननिष्ठ परंपरा हास्यास्पद ठरवली आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *